What is God Maria Wirth
 
गॉड म्हणजे काय?

हिंदु अशा प्रकारच्या बौद्धिक जोखडातून मुक्त असतात. अशी अंधश्रद्धा बाळगायला त्यांना कधी सांगितलं जात नाही. त्यातल्या कित्येकांचा देवदेवतांवर विश्वासही नसतो. पण त्या सर्वव्यापी ब्रह्मावर त्यांची श्रद्धा असते.

The article has been translated from English by Professor Manohar Railkar

आपण गॉड शब्दाचाच उपयोग करू या. म्हणजे जणु काही गॉड म्हणजे काय ते आपल्याला कळतं, असं सुचवू या. पण, खरंच आपल्याला काही कळतं का? “तर? अर्थात.” असं काहीजण म्हणतीलही. कारण, इंग्रजीतला गॉड हा शब्द विश्वाचा निर्माता, किंवा सर्वोच्च सत्य असा अर्थ सुचवतो.

आपलं जग आणि आपण कुठून तरी निर्माण झालो, ह्याबद्दल फारशा कुणाला शंका वाटत असेल असं नाही. आणि कोठून आलो, ह्याचं उत्तर गॉडपासून, असंही उत्तर दिलं जाईल. हा गॉड पुरुषच असतो आणि तो काही निवडक व्यक्तींशींच बोलतो, आणि इतरांना त्या निवडक व्यक्तींमार्फतच गॉडशी संपर्क साधता येतो, असंही सांगितलं जातं.

तो दयाळू असल्याचंही सांगतात. मात्र जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यावरच तो प्रेम करतो, केवळ त्यांच्याकरताच तो दयाळू असतो आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्याबद्दल त्याला किंचितही दया वाटत नाही, इतकंच नव्हे तर तो त्यांना नरकाग्नीत जळण्याकरता पाठवतो.

जगात अब्राहमी (ख्रिस्ती नाही तर मुस्लीम) पंथ मानणाऱ्यांचीच बहुसंख्या असल्यामुळं ह्याच दृष्टिकोनाचा प्रभाव अधिकतर आढळतो. हा दृष्टिकोन आणि नरकाग्नीची कल्पना पिढ्यान पिढ्या बालवयापासूनच सर्वांवर लादण्यात येते. परिणामी, प्रौढ वयातही बहुतेकांना त्यासंबंधी शंकाही येत नाही. ते त्यांच्या मानसिक घडणीचाच अविभाज्य भाग होऊन जातं. पुन्हा, आपण योग्य मार्गावर आहोत आणि आपल्यालाच गॉडचं खरं रूप माहीत आहे, असं वाटण्यात माणसाचा अहंकारही सुखावतो. अशा मनोवृत्तीच्या माणसांचीच बहुसंख्या आहे. गॉडच्या त्या रूपावर कुणी टीका केली तर ते त्याच्यावर राक्षसाप्रमाणं तुटूनही पडायला कमी करीत नाहीत.

ख्रिश्चनता आणि मुस्लीमता अब्राहमनी असल्यामुळं त्यांचे दृष्टिकोन सारखे आहेत, तरी आपलंच म्हणणं आणि आपलाच गॉड सत्य असल्याचा दोघांचाही आग्रह असतोच.

त्यामुळं, सर्व जगाला आपला विशिष्ट गॉड सत्य असल्याचं मानायला लावायचं आपलं कर्तव्य आहे, असं दोन्ही पंथाभिमान्यांना वाटतं. म्हणजे सर्वांनी ख्रिस्तीच व्हायला पाहिजे, असं ख्रिस्त्यांना वाटतं तर सर्वांनी मुस्लीमच असायला पाहिजे असं मुस्लीमांना वाटतं. ते साधण्याकरता कोणत्याही क्रूर मार्गाचासुद्धा अवलंब करायची त्यांची सिद्धता असते.

आपला एकच गॉड काय तो सत्य असल्याची त्या दोघांची पक्की श्रद्धा असल्यामुळं, अनेक देवांची उपासना करणारे सगळे अति निकृष्ट असतात आणि त्यांना नष्टच करायला हवं ह्याविषयी दोघांचं अगदी एकमत असतं. म्हणून मूर्तिपूजकांची म्हणजेच हिंदूंची तीव्र निंदा करण्याच्या आपल्या वागण्याचं समर्थनही दोघे करीत राहतात.

गॉडबद्दच्या ह्या कल्पनेची चिकित्सा होण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे. तीही इतरांनी नव्हे, तर त्यांनी स्वतःच करायला हवी. तो सर्वशक्तिमान ईश्वर आपल्याला मानणाऱ्यांच्या बाबतीत परमदयाळू असून इतरांच्या बाबतीत परमकठोर असतो, असं शक्य तरी आहे का?

यापेक्षा निराळा दृष्टिकोन कुठं नाही का? इथंच प्राचीन भारताचा प्रवेश आवश्यक वाटतो.

ख्रिश्चनता आणि मुस्लीमता क्षितिजावर येण्याच्या सहस्रावधी वर्षं आधी, अतिप्राचीन काळी वैदिक धर्माचा (म्हणजेच आजचा हिंदु धर्म) उदय झाला आहे. ज्याला ब्रह्म म्हणतात, त्या सर्वशक्तिमान तत्त्वाबद्दलचं त्यांचं म्हणणं अतिशय प्रगल्भ आहे. (त्याला, परमात्मा, चित् अशी आणखीही नावं आहेत.)

हे ब्रह्म कुणी अतिमानवी व्यक्ती नव्हे, ती पुरुषही नाही वा स्त्रीही नाही. पण अतिशय तरल, अदृश्य सर्वज्ञ आणि सर्वांचं अधिष्ठान असं तत्त्व आहे. ऋषींनी चिंतन करून त्या तत्त्वाचं ज्ञान करून घेतलं, त्यांना त्या दिव्यत्वाचा अनुभवही आला. आणि, “ब्रह्म डोळ्याला दिसत नाही. पण त्याच्यामुळंच पाहण्याचं सामर्थ्य डोळ्यांना येतं. त्याचं रूप आपल्या मनाला कळणार नाही, पण विचार करण्याचं सामर्थ्य त्याच्यामुळंच आपल्या मनाला लाभतं (केनोपनिषद).”

केवळ ब्रह्मच सत्य असून, सारं दृश्य जगत मिथ्या असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. दृश्य जग त्याच्या आधारानं भासतं पण तो भासच होय. त्याकरता त्यांचा दृष्टांत असा, अंधुक प्रकाशात भूमीवर पडलेली दोरी सर्पवत् भासते. आणि आपल्याला भीती वाटते. पण प्रकाशामुळं सत्याचा अनुभव येऊन आपली भीती नाहीशी होते.

ऋषी आणखी एक दृष्टांत देतात. आपण कुंभाराच्या दुकानात गेलो तर तिथं आपल्याला विविध प्रकारची मातीची भांडी आढळतात. पण सर्वांचं अधिष्ठान मातीच असते. ते आपल्या ध्यानात येत नाही. माठाचं रूप घेतलेली ती मुळात मातीच असते. तद्वतच ब्रह्मच आपल्या व्यक्तित्वाचं अधिष्ठान असतं. पण, त्यांच्या ह्या म्हणण्याला काही आधार?

ख्रिश्चन किंवा मुस्लीम पुजारी एका पुस्तकाचाच आधार घेतात. पण ऋषींनी आपल्या बुद्धीच्या आधारावर खोल चिंतन केलं, शोध घेतला, आणि तोच अनुभव त्यांनी उपनिषदांसारख्या ग्रंथांच्या रूपात व्यक्तवला. कारण त्यांना जे उमगलं, त्याची गमकं अशी,

एक: त्याला सर्व काळ, भूत, वर्तमान आणि भविष्यातही अस्तित्व हवं.

दोन: प्रकाशण्याकरता त्याला कुणाचाही आधार लागू नये. म्हणजेच ते स्वयंप्रकाशी असावं.

ही दोन गमकं लावली तर जग असत्य ठरतं. ते सर्वदा असतंच असं नाही, प्रकाशाकरता त्याला दुसऱ्यावर अवलंबावं लागतं आणि त्याला स्वतःची कोणतीही जाणीव नसते.

मग, जग असत्य असल्याचा निर्णय झाल्यावर काय राहतं? अत्यंत तरल, ज्ञानरूप आणि सर्वांचं अधिष्ठान असं जे उरतं ते. म्हणजे आपल्या जाणीवेचं जे उगमस्थान, ते उरतं. वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगळं नसतं. ते आपल्या अस्तित्वाला आधाररूप असतं. त्यामुळं ते जाणून त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. त्याकरता आपल्यामधलं ते शाश्वत तत्त्व आणि आपल्या सातत्यानं बदलणाऱ्या मनाचं ते अधिष्ठान, अंतर्मुख होऊन शोधलं पाहिजे. त्यासाठी त्याचा ध्यास घेतला पाहिजे.

दुर्दैवानं आपल्या जाणीवेचा स्रोत असलेल्या त्या तत्त्वाचाच आपल्याला विसर पडला असून आपण बाह्य जगतालाच महत्त्व देऊन मनाच्या इतस्ततः भटकण्याला आळा घालण्याकडे एकदाही वळत नाही. हे दुर्दैवी असण्याचं कारण म्हणजे मुळात आपल्या जाणीवेचा आणि प्रेरणेचा तो स्रोत आहे, असं ऋषि सांगत असून आपाण तिकडे लक्ष देत नाही, हेही दुर्दैवच. जगातल्या कोणत्याही वस्तूपेक्षा ते अधिक आनंददायी आहे, असं ऋषी स्वानुभवानं सांगतात.

पण, इंग्रजीमधील गॉड शब्दानं, ते एकमेव, सर्वोच्च सत्य आणि सर्वशक्तिमान आहे असं काहीसुद्धा सूचित होत नाही. आणि हे दोन संप्रदाय गॉडबद्दल जे काही सांगतात, ते हिंदुत्वातील देवतांच्या जवळपासही येत नाही.

वैदिक देवता एका अर्थानं व्यक्तिरूप आहेत. त्या सातत्यानं बदलत्या जगाचा कारभार चालवतात. आणि मनुष्यमात्राचं आयुष्य सुखाचं होणं त्यांच्यावर अवलंबून असतं. पण त्यांचं वर्तन त्या कोणत्याही अब्राहमनी संप्रदायासारखं नसतं. म्हणजे कुणी त्यांची उपासना केली नाही म्हणून देवता त्या व्यक्तीला नरकाग्नीत जळत ठेवीत नाहीत.

ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्माचा गॉडसुद्धा कुणी भिन्न व्यक्ती नसून पक्षपाती वर्तनही करीत नाही, हे त्या संप्रदायाच्या पुरस्कर्त्यांच्या ध्यानात येत नाही आणि गॉड असा असला तर तो अंतिम सत्य असणं शक्य नाही, ही बाब विलक्षणच. वैज्ञानिकांना ते जाणवलं आहे. खरं तर, आपण जे सत्य शोधीत आहोत, ते जवळपास भारतीयांनी मांडलेलं ब्रह्मच असल्याचं आणि तेच अंतिम सत्य असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आहे. अशा आधुनिक वैज्ञानिकांत वोल्तेर (Voltaire), शोपेनहॉय्यर (Schopenhauer), श्रोडिंगर (Schrödinger), हायझेनबर्ग (Heisenberg), ओपेनहायमर (Oppenheimer), आइन्स्टाइन, स्टीव्ह जॉब्ज (Steve Jobs) आणि एलन मस्क (Elon Musk) ही नावं सांगता येतील. कदाचित त्यांतली काही ज्यूसुद्धा असतील.

ख्रिस्ती आणि मुस्लीम पुरोहितांना ते समजूनच घ्यायचं नसणं शक्य आहे. कारण आजची स्थितीच जगावर प्रभुत्व गाजवण्याच्या स्वतःच्या हेतूकरता त्यांना सोयीची वाटत असेल. त्या देवतांना न भजणाऱ्यांना त्या नरकाग्नीत जळत ठेवतात, अशी धास्ती त्यांच्या सश्रद्ध (believers) अनुयायांना राहिली तर ते आपापले संप्रदाय सोडून जाणार नाहीत, हेच त्यांना लाभदायक असू शकेल. पण, त्यामुळं मानवी बुद्धी जोखडात अडकून पडते. आणि हा त्या स्वतंत्र बुद्धीचा अपमान नव्हे का?

हिंदु अशा प्रकारच्या बौद्धिक जोखडातून मुक्त असतात. अशी अंधश्रद्धा बाळगायला त्यांना कधी सांगितलं जात नाही. त्यातल्या कित्येकांचा देवदेवतांवर विश्वासही नसतो. पण त्या सर्वव्यापी ब्रह्मावर त्यांची श्रद्धा असते. असल्या बौद्धिक स्वातंत्र्यालाच जगभर मान्यता मिळू शकते आणि सन्मानही लाभतो. आणि भारतीय विद्यार्थ्यांना परकीय भाषेतून शिकावं लागणं हा मोठाच अडथळा असला तरी त्यांना ते बौद्धिक स्वातंत्र्य असतंच.

Featured Image: Wikipedia

Disclaimer: The facts and opinions expressed within this article are the personal opinions of the author. IndiaFacts does not assume any responsibility or liability for the accuracy, completeness,suitability,or validity of any information in this article.