मूर्तिपूजा
 
मूर्तिपूजा हा धर्मांधतेचा उतारा

मन खरोखर मुक्त असते तेव्हा त्यास मूर्तींची गरज नसते. पण त्या अवस्थेपर्यंत कोण पोचले आहे? मूर्तिपूजेच्या विरोधकांपैकी नक्कीच कोणीच नाही.

This article has been translated into Marathi by Rajeev Deshpande. Original English article can be read here.

हे शिवा, माझ्या या तीन चुकांबद्दल मला क्षमा कर!

तू सर्वत्र विद्यमान असूनही मी काशीच्या यात्रेस आलो.

तुझा विचार करताना हे विसरलो की तू विचाराच्या पलीकडे आहेस.

तुझी प्रार्थना करताना तू शब्दातीत आहेस, हे विसरलो.

-आदिशंकराचार्य

 

यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांमधील कल्पनेप्रमाणे सृष्टीनिर्माता प्रभू हा सृष्टीहून भिन्न, स्वतंत्र आणि सृष्टीच्या पलीकडे विद्यमान् असल्यामुळे या धर्मांत ‘कोरीव प्रतिमांचे’ पूजन निषिद्ध आहे. ‘पूजन’ करायचे ते केवळ प्रभूचे, अन्य कशाची उपासना म्हणजे गंभीर गुन्हा, असा एकूण प्रकार. यातून मूर्तिभंजनच निष्पन्न होणार! अफगाणिस्तानातल्या बामियानमधल्या विराट बुद्धप्रतिमांचा ध्वंस ही काही तुरळक नासधूस नव्हती. त्याला तिथल्या (तत्कालीन) तालिबान राजवटीच्या सर्वोच्च न्यायालयाची मान्यता होती. स्थानिक जनतेने पुन्हा मूर्तिपूजेकडे वळू नये म्हणून अशा ‘बुत-परस्ती’ला नेहमीच धास्तावून असणार्‍या इस्लामी न्यायालयानेच बामियानच्या विध्वंसाचा आदेश दिला होता. दुर्दैव असे की, या धर्मांधतेतून निर्माण होणारी दैवते या मूर्त्यांपेक्षाही भयंकर असतात.

मूर्तिनिषेधाची कल्पना ही सृष्टीपल्याडच्या ईश्वरविषयक संकल्पनेत अडकून पडलेली आहे, आणि मानसशास्त्राला छेद देणारी आहे. उपासना म्हणजे काय, आणि मूर्ती किंवा प्रतिमा काय असते? केवळ सृष्टिनिर्मात्याचीच पूजा करण्याच्या आग्रहातून उपासनेचा सरळ अर्थ झाकला जातो. तुम्ही ज्या कशाचा आदर करता, सन्मान करता, ज्याकडे विशेष लक्ष देता, जिला ‘उच्चासनावर’ ठेवता, ती तुमची उपासनेची वस्तू असते. मन हे सदैव या ना त्या वस्तूची उपासना करीत असते. त्याच तुमच्या मूर्त्या होत.

किशोरवयीन मुले त्यांच्या खोलीत कधी रॉक स्टार्सची पोस्टर्स लावतात. त्या स्टार्सना आपण नेहमीच तरुणाईची आराध्य दैवते म्हणतो. तुम्ही सचिन तेंडुलकर किंवा डेव्हिड बेक्हमचे चित्र लावता, तेव्हा त्यांना आदर्श मानता, सन्मान देता, उच्चत्व देता. ते तुमच्यासाठी पूज्य प्रतिमा होतात. किंवा तुम्ही जेव्हा तुमच्या कारकडे अत्यंत लक्ष देता, कुणी थोडाही ओरखडा त्या कारवर केल्यास अत्यंत कष्टी होता, तेव्हा ती कार तुमच्यासाठी उपास्य मूर्ती असते. त्या कारची छोटी प्रतिमा बनवून तुम्ही गाभार्‍यातही ठेवू शकता, पण त्याची जरूरी नसते. तुम्ही गॅरेजच्या स्वरूपात त्या कारचा गाभारा आधीच बनवलेला असतो.

मूर्ती म्हणजे तुमच्या अन्तकरणात ठसणारी गोष्ट. सर्वात बळकट मूर्त्या या खरे तर अमूर्त असतात. मन ज्यांना चिकटून बसते, त्या संकल्पना म्हणजे या बळकट मूर्त्या. तुम्ही स्वतःला ‘निधर्मी’ वा ‘नास्तिक’ म्हणवता का? तुमच्यासाठी पैसा ही जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल, त्याचेच कदाचित तुम्ही सतत चिंतन करीत असाल. मग तुम्ही कुबेराची मूर्ती बनवून तिची पूजा केली नाही, तरी वेगळ्या प्रकारे तुम्ही तेच करीत आहात. किंवा तुम्ही कामुक असाल. म्हणजे तुम्ही मदनाची, अर्थात कामदेवाची पूजा करीत आहात.  केवळ सांगण्याची पद्धत वेगळी. किंवा तुमच्यासाठी तुमची नोकरीच पूज्य असेल, किंवा एखादे ध्येय. अथवा निधर्मिवादाची संकल्पना हीच तुमची देवता असेल – त्याविरुद्ध कुणी काही बोलले म्हणजे जणू ईश्वरनिंदा झाली असे वाटून तुम्ही नाराज होत असाल. क्रांतीचा लाल झेंडा तुमची मूर्ती असू शकतो. रोज सकाळी अमेरिकन सरकारी शाळांमध्ये मुले राष्ट्रध्वजास वंदन करतात. ती त्यांची जणू मूर्तीच आहे. म्हणूनच कोणी तो झेंडा जाळला किंवा त्याची विटंबना केली तर तेथे केवढा गहजब होतो. या सर्व देवता आणि त्यांच्या मूर्त्यांच्या जोखडातून ना तुमची काल्पनिक ‘नास्तिकता’ तुम्हाला सोडवू शकते, ना तुमच्या धर्मग्रंथातली ‘तू कोरीव मूर्ती बनवणार नाहीस’ इत्यादी धर्माज्ञा.

किंबहुना, तुमचे धर्मग्रंथ ह्याच तुमच्या सर्वात मोठ्या मूर्त्या आहेत. शीख लोक त्यांच्या ग्रंथसाहेबास वारा घालतात – त्या ग्रंथास गरमी होत असते की काय? पाकिस्तानात एका महिलेला जमावाने ईश्वरनिंदा केली म्हणून ठार केले – काय तर म्हणे तिच्याकडून कुराणाची काही पाने जाळली गेली होती. शाई आणि लगद्याच्या वस्तूची काय ही आसक्ती! ही मूर्तिपूजा नाही? तुमच्या धर्मग्रंथास ‘ईश्वराचा शब्द’ अशी उपाधी देऊन त्यासाठी तुम्ही मरायला आणि मारायला जेव्हा उद्युक्त होता, तेव्हा तो तुमची परमपूज्य मूर्ती झालेला असतो. कुठल्या एका ग्रंथाभोवती घुटमळणारी अशी ‘बुक परस्ती’ ही ‘बुत् परस्ती’पेक्षा भयंकरच. तुमच्या मनाच्या दृष्टीने ही केवळ अजून एक कल्पना असते. धर्मवेड्यांसाठी धर्मग्रंथ ही एक उपास्य मूर्ती असते. त्यांनी ते फार मनावर घेतले तर त्या कल्पनेतच ते रुतून बसतात. ती मूर्ती त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवू शकते आणि लोकांपासून आणि स्वतःपासूनही त्यांना वेगळे पाडू शकते. केवळ ग्रंथात ‘सर्व राष्ट्रांस तुमचे शिष्य बनवा’ अशी आज्ञा आहे, म्हणून पोथीनिष्ठ मिशनरी लोक धर्मांतराद्वारे सांस्कृतिक हिंसाचार करत सुटले. एकीकडे प्रेषिताची कुठलीही प्रतिमा नको असा श्रद्धाळूंचा आग्रह, तर दुसरीकडे प्रेषितांच्या केसाची ‘हजरत बाल’ म्हणून मोठ्या मशिदीत आदरपूर्वक स्थापना. अशा चोरपावलांनी येण्यार्‍या प्रतिमापूजेविरुद्ध अथवा ‘धर्मप्रतारणे’विरुद्ध वहाबी मतवाद्यांचा आणि आयसिसच्या अनुयायांचा संघर्ष सुरू आहे. मात्र धर्मप्रतारणेची, ‘शिर्क’ची संकल्पना हीसुद्धा मुळात मनातली एक प्रतिमाच आहे.

अब्राहमी धर्मांचा मूर्तिपूजेविरुद्धचा कांगावा निष्फळ आहे. त्यामुळे त्यांच्या मूर्त्या विशिष्ट आकार सोडून धर्मग्रंथाचा आकार घेतात. मन ज्याचा विरोध करते, ती गोष्ट टिकून उरते. मनाला नेहमी कशाची तरी धारणा करायची असते. अमकी रूपे धरायची नाही म्हटले तर मन दुसर्‍या रूपांना धरू बघते. धर्मग्रंथावर टीका करण्याची किंवा, अल्ला न करो, तो ग्रंथ जाळण्याची पापबुद्धी दुप्पट जोमाने वेगळ्या प्रकारे उफाळून येते. मूर्तिध्वंस या कट्टरतेतून जन्म घेतो, आणि कट्टरता वाढवतो. बौद्ध, जैन, वा हिंदू, सर्वच भारतीय धर्मपरंपरांमध्ये मूर्तिपूजेचा समावेश आहे. ब्रिटिश राजवटीतील गुलामी मानसिकतेतून जन्मलेली शीख संप्रदायाची अब्राहमी साच्यात वेगळा ’धर्म’ म्हणून केलेली मांडणी त्या संप्रदायास ‘मूर्तिपूजक, जातिमूलक’ हिंदूंपासून दुरावण्यास कारणीभूत झाली. त्यातून एक प्रकारची कट्टरता निर्माण झाली. रा. स्व. संघावर बर्‍यापैकी प्रभाव असलेल्या आर्य समाजातही मूर्तिपूजेला हीन मानल्यामुळे कट्टर प्रवृत्तीचा प्रादुर्भाव झाला.

मनास खरी मुक्ती मिळत नाही तोवर ते नेहमीच मूर्त्यांना चिकटून असणार. कल्पनांचे थरावर थर रचून आपण आपले विश्व निर्माण करतो. मोक्ष म्हणजे या सर्व कल्पनांपासून मुक्ती, आणि वास्तवाचे यथार्थ ज्ञान. पण अशा कल्पनामुक्त आणि अमूर्त मनःस्थितीस प्राप्त झालेली व्यक्ती विरळच. केवळ मूर्तिपूजा करू नका म्हटल्याने तसे होत नसते. मूर्तिनिषेधाच्या का होईना, कुठल्यातरी कल्पनेस मन चिकटतेच. तीही एक मूर्तीच. मग याला उपाय काय?

मनाला मूर्त प्रतिमांचे आकर्षण असते हे सत्य भारतमूलक परंपरांनी स्वीकारले आहे. कुठल्याही मुक्तीची सुरुवात ही बंधनाचे सत्य स्वीकारून होत असते. मूर्त्यांचा त्याग म्हणजे मनाच्या नैसर्गिक वृत्तीचा केवळ अज्ञानमूलक विरोध. सत्याचा स्वीकार ही मुक्तीची पहिली पायरी. मनाला मूर्ती आवश्यक आहे हे एकदा स्वीकारले की, मग ती मूर्ती कोणती असावी हे तुम्ही जाणीवपूर्वक ठरवू शकता. मनाच्या आतली मूर्ती ही बाहेरच्या मूर्तीपेक्षा बरेचदा घातक ठरते. बाह्य स्वरूपाची मूर्ती मनाच्या एकाग्रतेस साह्य करते. म्हणून आपल्या ऋषींनी आपले बाह्य लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्याला उच्चतर पातळीवर नेण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट प्रतिमा दिल्या.

मूर्ती म्हणजे शब्दशः दिव्यत्वाचे मूर्त स्वरूप. तिला हे दिव्यत्व कुठून मिळते? काही आकार मनावर विशिष्ट परिणाम करतात. संगीतरचनेचा जसा मनावर प्रभाव पडू शकतो, तसाच या रूपरचनांचाही पडतो. ज्या रूपांतून प्रेम, करुणा, सद्बुद्धी, ज्ञान, धैर्य आणि सामर्थ्य हे सद्गुण प्रकट होतात, त्यांतून मनासही तसे शुभ वळण मिळते. पण मूर्ती हे एखाद्या संगीतरचनेप्रमाणे केवळ एक सुंदर शिल्प असते काय? तिचे पावित्र्य कुठून येते? मूर्तीच्या दर्शनाने मनात उद्भवणार्‍या सद्गुणांत त्या मूर्तीचे पावित्र्य सामावलेले असते. जणू आपणच आपल्या धारणेतून त्या मूर्तीस दिव्यत्व देतो. मूर्तीची आपण विधिवत् स्थापना करतो, मंत्रोच्चारणातून आपल्यातली शक्ती, आपल्या ध्यानाची आणि श्रद्धेची शक्ती, संक्रामित करतो. तिला स्वतःहून उच्च आसनावर बसवतो. आणि मग पूजेच्या उपचाराद्वारे तिच्याशी स्वतःला जोडतो.

पूजा करताना आपण जाणीवपूर्वक पंचमहाभूतांचा वापर करतो. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही पाचही तत्त्वे पूजेत उपस्थित असतात. यातून आपण व्यक्त सृष्टीशी जवळीक साधतो. मनाला कुठल्यातरी कल्पनेत गुंतवण्यापेक्षा अशी पूजा आपले ध्यान आपोआपच वर्तमान क्षणाकडे वळवते. ईश्वराची या पंचमहाभूतांद्वारे पूजा केल्याने आपण मनुष्य असतानाच सबंध विश्वाशी नाते जोडतो.  कुठलीही मूर्ती तुम्हाला इतर मूर्त्यांचा विध्वंस करा, अथवा नास्तिकांशी, काफिरांशी  युद्ध करा असे सांगत नाही. त्यासाठी लिखित मजकूर लागतो. कट्टरता अशा मजकुराशिवाय असूच शकत नाही. धर्मग्रंथांतील मजकुराचा शब्दशः अर्थ लावण्यार्‍या सुशिक्षितांचाच आयसिस, अल कायदा, सदर्न बाप्टिस्ट इत्यादी अतिरेकी चळवळींमध्ये भरणा आहे.

सर्व चराचर विश्व हे एकाच चैतन्याचा अंश आहे आपल्याला जाणीव झाली की, या जगाचे आस्तिक आणि नास्तिक, किंवा पवित्र आणि जड, इत्यादी विभाग पाडणार्‍या कट्टरतेतून आपण मुक्त व्हायला लागू. आपण ज्याला पवित्र मानतो, ते आपल्यासाठी पवित्र होते, आणि आपण सद्बुद्धिपूर्वक जे उपास्य निवडतो ते उपास्य आपल्याला आपल्या त्या अंतरात्म्याकडे नेते, ज्याच्याद्वारे आपण सर्वच जोडलेले आहोत. पंचमहाभूतांतून केलेली बाह्य कृती दिव्य स्वरूपाच्या उपासनेतून आपल्याला आपल्याकडेच परत आणते. मन सतत अनेक मूर्त्यांच्या मागे धावते – कधी फिल्म स्टार, कधी कार, तर कधी पैसा आणि कपडालत्ता. या सर्वांचाच आपल्या जाणिवेवर प्रभाव पडत असतो. पण या सर्वच प्रतिमा आपल्या चेतनेला उच्च पातळीवर नेऊ शकत नाहीत. ज्या प्रतिमांवर आपण ध्यान केंद्रित करतो, तिचे गुण आपण आत्मसात् करतो. पूजा हीसुद्धा ध्यान केंद्रित करण्याची कृती आहे. म्हणून आपण जेव्हा दैवी प्रतिमांचे ध्यान करतो, तेव्हा आपण उच्च मनोवस्थेस प्राप्त होतो. ऋषींनी आपल्या संकल्पातून मनास अशा प्रकारे साह्य करू शकणार्‍या प्रतिमांचा आविष्कार केला. ही अनुभूतीची गोष्ट आहे; मनातले विचार या अनुभूतीच्या आड येऊ शकतात.

मन खरोखर मुक्त असते तेव्हा त्यास मूर्तींची गरज नसते. पण त्या अवस्थेपर्यंत कोण पोचले आहे? मूर्तिपूजेच्या विरोधकांपैकी नक्कीच कोणीच नाही. चैतन्याचा साक्षात्कार होइस्तोवर मूर्त्या लागणारच. आणि साक्षात्कार झालेल्याला विरोध करायलाच काही शिल्लक राहिलेले नसते. आंतरिक आणि बाह्य मूर्त्या अशा व्यक्तीसाठी सारख्याच प्रकारे ईश्वरी लीलेचा भाग असतात, आणि त्यांतून त्याला केवळ आनंद मिळतो. मूर्तिध्वंस हे एक अजाणतेपणीचे कृत्य आहे. मूर्तिभंजक होण्यास उत्सुक असणार्‍या मूर्तिद्वेष्ट्यांनी त्यांच्या धर्मग्रंथाच्या स्वरूपातल्या मूर्तीपासून सुरुवात केल्यास बरे. त्यातून जगाची पोथीनिष्ठेच्या आणि तथाकथित ‘एकमेव खर्‍या देवाच्या’ पूजेच्या धर्मांधतेतून सुटका होईल.

Disclaimer: The facts and opinions expressed within this article are the personal opinions of the author. IndiaFacts does not assume any responsibility or liability for the accuracy, completeness, suitability, or validity of any information in this article.